Monday, 3 April 2017

वाढत्या तापमान

वाढत्या तापमानामुळे होऊ शकतो उष्माघात, लाळ्या-खुरकूत, मुतखडा
अवर्षणग्रस्त स्थिती व कडक उन्हाळ्यामुळे जनावरांत बऱ्याच रोगांना पोषक परिस्थिती तयार होऊ शकते. उन्हाळ्यात जनावरांना उष्माघात, मुतखडा, लाळ्या-खुरकूत आदी आजार होण्याची शक्यता असते. त्यासाठी या आजारांवर वेळेवर उपचार करावेत.
डॉ. गिरीश यादव

१) उष्माघात -
- कडक ऊन व जास्त तापमानामुळे दुधाळ संकरित गाई, म्हशी, वासरे उष्माघातास बळी पडतात.
- उष्णतेमुळे वातावरणातील आर्द्रता वाढते, याचा परिणाम जनावरांच्या शरीरावर होतो व उष्माघात होतो.

उष्माघात होण्याची कारणे -
- जनावरांना वेळेवर पिण्याचे पाणी न मिळणे, उन्हात चरण्यासाठी सोडणे, उन्हात लांबवर वाहतूक करणे, जनावरांना बांधण्याची जागा कोंदट, बंद, अस्वच्छ असणे.
- लहान वासरे व जास्त वयस्क जनावरे व जास्त केस असणारी जनावरे या रोगास जास्त बळी पडतात.

उपाय -
- जनावरांना पिण्यास ४ वेळा स्वच्छ व थंड पाणी द्यावे.
- जनावरे बांधण्याची जागा स्वच्छ, हवेशीर व थंड असावी तसेच गोठ्याचे छप्पर थोडे उंच असावे.
- म्हशी व मेंढ्यांच्या अंगावरील केस काढून घ्यावेत.
- उन्हाच्या वेळी जनावरांची वाहतूक करू नये.
- शक्य असेल तर जनावरांच्या गोठ्यात फॅनची सोय करावी.
- गोठ्यात उन्हाच्या झळा येऊ नयेत म्हणून गोठ्याला बाहेरून पाण्याने भिजवलेले गोणपाट लावावेत.
- गोठ्याच्या छतावर गवत अथवा कडबा पसरावा, त्यामुळे गोठ्याचे छत उन्हामुळे तापणार नाही.
- थंड वेळी म्हणजेच सकाळी व सायंकाळीच जनावरे चरावयास सोडावीत.

२. लाळ्या-खुरकूत -
- या रोगामुळे दूध उत्पादन व प्रजोत्पादन क्षमता घटते, वांझपणा येतो, बैलांची काम करण्याची क्षमता घटते.
- हा आजार ‘पिकोर्ना’ नावाच्या विषाणूमुळे होतो. या विषाणूच्या प्रमुख सात जाती आहेत.
- हा रोग संसर्गजन्य असल्याने इतर जनावरांनाही होतो.
- संकरित गाई, म्हशींना हा रोग मोठ्या प्रमाणात होतो.
- रोगी जनावरांचा प्रत्यक्ष संपर्क, जनावराची लाळ, लघवी, शेण यांनी दूषित झालेला चारा तसेच हवेमार्फतही हा रोग पसरतो.

उपाय -
- मार्च ते मे महिन्यादरम्यान या रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. हा रोग विषाणूजन्य असल्यामुळे यावर खात्रीशीर इलाज नाही.
- लहान वासरांना पहिली मात्रा ३ ते ४ महिने वयात द्यावी व दुसरी मात्रा ६ ते ८ महिने वयात द्यावी. नंतर दर सहा महिन्यांनी म्हणजे सप्टेंबर व मार्च महिन्यामध्ये द्यावी.
लस दिल्यावर एक वर्षापर्यंत रोगाचा प्रतिबंध होऊ शकतो.
- बऱ्याचदा लस देऊनही रोग झाल्याचे आढळते. अशावेळी रोगाची तीव्रता कमी असते. त्यामुळे लसीकरण आवश्य करून घ्यावे.
- लसीकरण केल्यावर रोग होण्याची शक्यता फारच कमी असते.
- उन्हाळी मोसमात चाऱ्यासाठी जनावरे एका भागातून दुसऱ्या भागात जातात किंवा विविध भागांत चारली जातात, हे टाळावे.
- रोगी जनावरास इतर जनावरांपासून वेगळे ठेवावे.
- रोगी जनावर चारलेल्या ठिकाणी निरोगी जनावर चारू नये.
- सार्वजनिक हौदावर पाणी पिल्याने आजारी जनावराची लाळ हौदातील पाण्यात मिसळते व निरोगी जनावरांना रोगाचा प्रसार होतो.

३) मुतखडा -
- जनावरांना पिण्यास वेळेवर मुबलक पाणी मिळत नाही, त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे हा रोग होऊ शकतो.
- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले, की क्षारांचे प्रमाण वाढते.
- जनावरांच्या लघवीतून असे क्षार बाहेर पडतात.
- क्षारयुक्त लघवीतील क्षार बैलांच्या मूत्रमार्गाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वळणावर साचून राहतात व मुतखडा होऊ शकतो.
- या व्यतिरिक्त खारे पाणी पिणे, मूत्रमार्गाची रुंदी कमी असणे, जनावरास ‘अ’, ‘ड’ जीवनसत्त्वे व कॅल्शिअमची कमतरता, मूत्रमार्गाची इजा व खाद्यात खनिजांचे प्रमाण जास्त असणे अशीही या रोगाची कारणे आहेत.
- पाण्याची कमतरता व खारे, जड पाणी पिणे ही प्रमुख दोन कारणे मुतखडा होण्यास कारणीभूत ठरतात असे आढळले आहे.

उपाय -
- जनावरांना वर्षभर स्वच्छ, थंड व मुबलक प्रमाणात पिण्यास पाणी द्यावे.
- जनावरांना हिवाळा व पावसाळ्यात तीन वेळा तसेच उन्हाळ्यात चार वेळा गोडे, शुद्ध व कमी क्षार असणारे पाणीच पिण्‍यास द्यावे.
- जनावरांच्या खाद्यात कॅल्शिअम, फॉस्फरस व इतर क्षारांचे प्रमाण योग्य असावे.
- मूत्रमार्गातील कोणतीही जखम दुर्लक्षित न करता त्यावर पशुवैद्यकाकडून वेळीच उपाय करावेत.
- जनावरांना सकस व संतुलित आहार द्यावा.
- जनावरांना खाद्यातून अ, ड जीवनसत्त्वांचा पुरवठा करावा.
- उन्हाच्या वेळी जनावरांना काम देऊ नका.
- जनावरांच्या खाद्यात जास्त प्रमाणात खनिजे, ऑक्झॅलेट किंवा फॉस्फेट जाणार नाही याची काळजी घ्यावी.

No comments:

Post a Comment

Job

CALL 9011447702 Saiti Internet Online Destination from filing center  Vitthal wadi nandurkhi road shirdi